“ज्ञानाचा प्रसार हाच राष्ट्राच्या उद्धाराचा राजमार्ग आहे” या साध्या पण गहन वाक्याला स्वतःच्या कार्याने आणि विचारांनी खरे करणाऱ्या धर्मानंद कोसंबी यांच्या बद्दल माहिती तशी फार कमी लोकांना आहे. बौद्ध धर्म मानवी आयुष्याच्या अस्तित्वाच्या निम्म्या काळापर्यंत प्रचलित असूनही, त्याला पुन्हा नवा पाया देण्याची गरज कोसंबी यांना वाटू लागली. विज्ञाननिष्ठ व बुद्धिवादी नव्या युगाच्या प्रेरणांना अनुरूप स्वरूप देणे आवश्यक आहे. नव्या युगाच्या प्रेरणांशी सुसंगत असे बुद्ध धर्माचे स्वरूप राहिले नाही असे लक्षात आल्यामुळे, ते स्वरूप विवेक बुद्धीने शोधण्याचा प्रयत्न धर्मानंद कोसंबी यांनी केला.
वयाच्या २३-२४ व्या वर्षी धर्मानंदांनी बुद्धाच्या शोधाकरिता गृहत्याग केला. त्यावेळी ते फार शिक्षित नव्हते. मराठी व्यतिरिक्त संस्कृत, हिंदी, इंग्रजी इतर कोणत्याही भाषा येत नव्हत्या. पण बुद्ध चरित्राच्या वाचनाने बुद्ध दर्शनाचा वेध लागला आणि अध्ययनार्थ ते बाहेर पडले. सात वर्षांत पाली आणि संस्कृत या भाषेतील बुद्ध धर्माच्या साहित्यात पारंगत झाले.
कोसंबी संस्कृत शिकण्यासाठी पुण्यात गेले, इथून त्यांचा ज्ञानलालसेचा प्रवास सुरू झाला. पुण्याहून ते उज्जैन, इंदूर, ग्वाल्हेर आणि प्रयाग नंतर वाराणसीला गेले. अनेक अडचणींचा सामना करत त्यांनी संस्कृतमध्ये प्रचंड प्रगती केली. नंतरची तीन वर्षे नेपाळ येथे बौद्ध धर्माच्या मूळ भाषेत, पाली, अभ्यास करण्यासाठी घालवली. पुढे कलकत्ता आणि मग सिलोन (आजचे श्रीलंका) येथील विद्योदया कॉलेजमध्ये दाखल झाले. अखेरीस, १९०२ मध्ये त्यांनी हिक्कडुवे श्री सुमंगल थेर यांच्या मार्गदर्शनाखाली तीन वर्षे अध्ययन केले आणि १९०२ मध्ये बौद्ध भिक्षू म्हणून दीक्षा घेतली. बर्मा येथील बौद्ध ग्रंथांचे बर्मी भाषेत तुलनात्मक अध्ययन करून सात वर्षे परदेशात घालविल्यानंतर, कोसंबी भारतात परतले.
धर्मानंद कोसंबींनी कलकत्ता विद्यापीठात वाचक म्हणून काम केले. त्यांनी नंतर बडोद्यात संशोधन सहकारी म्हणून काम केले आणि पश्चिम भारतात व्याख्याने दिली. शेवटी, ते पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये गेले. बॉम्बेमध्ये हार्वर्ड विद्यापीठाचे डॉ. जेम्स वुड्स यांच्या भेटीनंतर, बौद्ध तत्त्वज्ञानावर आधारित ‘विसुद्धिमग्गा’ या पुस्तकाची समीक्षात्मक आवृत्ती संकलित करण्याचे काम पूर्ण करण्यासाठी त्यांनी हार्वर्डला जाण्याचे निमंत्रण स्वीकारले. १९१० मध्ये त्यांनी इंग्लंडमार्गे हार्वर्डला प्रवास केला आणि दोन वर्षे तिथे राहण्याचा निर्णय घेतला. हार्वर्डमध्ये, त्यांनी रशियन भाषा शिकली आणि मार्क्सवादात रस घेतला. १९२९ मध्ये, ते सोव्हिएत युनियनला गेले आणि लेनिनग्राड विद्यापीठात पाली शिकवले.
भारतातील स्वातंत्र्याचे वारे जोरदार वाहत होते, कोणताही सजग माणूस तेव्हा स्वस्थ असणे शक्यच नव्हते. कोसंबीही भारतात परतले व गुजरात विद्यापीठात मानधनाशिवाय शिकवू लागले. त्यांनी मिठाच्या सत्याग्रहात स्वयंसेवकांची भरती सुरू केली. या सहभागामुळे त्यांनी सहा वर्षे तुरुंगवासही भोगला.
अनेक भाषा आणि अनेक प्रदेशात आपले योगदान देणारे कोसंबी यांचे योगदान मराठी साहित्यात उल्लेखनीय आहे. धर्मानंद कोसंबी यांचे लिखाण सरळ, सोप्या मराठीत आहे. त्यात जातककथा संग्रह हे त्यांचे दुर्मिळ साहित्य समाविष्ट होते. पाली वाङ्मयात ‘जातककथा’ नावाचा प्रसिद्ध ग्रंथ आहे. यात एकूण ५४७ कथा असून या कथा सिंहलद्वीपात, ब्रह्मदेशात आणि संयामी यांत फार लोकप्रिय आहेत. पण हिंदुस्थानात त्यांच्या जन्मभूमीत याचा परिचय फार कमी आहे. पण त्याचा भारतीय साहित्यात संदर्भ येतो. त्या समग्र देण्याचे कार्य मराठीत कोसंबी यांनी केले. जातक कथा प्रसिद्धीला आणण्याचे कार्य व्ही. फॉसबॉल या जर्मन विद्वानाने केले. त्या आधारेच ह्या कथा लिहिल्या आहेत. यथार्थ भाषांतर न करता त्याचे सार यात आहे.
बुद्ध व बौद्ध धर्म ही जागतिक संस्कृतीला मिळालेली अलौकिक देणगी असून प्राचीन इतिहासातील एक महान घटना आहे. अंतिम व नैतिक तत्त्वाचा आधार हे त्याचं वैशिष्ट्य. आचार्य धर्मानंदांनी बुद्ध व बौद्ध धर्माच्या वाङ्मयीन पायाची रचना केली.त्यांचे कार्य फक्त शिकणे आणि शिकवणे यापुरते मर्यादित नव्हते. देशांच्या आणि खंडांच्या सीमारेषा पार करत त्यांनी अखंडपणे काम केले. अभ्यासक, शिक्षक, लेखक, स्वातंत्र्य चळवळीतील योगदान अशा अनेक गोष्टींसाठी त्यांना देश त्यांचा सदैव ऋणी राहील.