Blog|India's Kaleidoscope|Marathi Lekh

बाई नावाचा माणूस

Written in April , 2017

पिता रक्षति कौमारे, भर्ता रक्षति यौवने। रक्षन्ति स्थविरे पुत्रा, न स्त्री स्वातंत्र्यं अर्हति।

म्हणजे ‘बालवयात वडील सांभाळतात, तरुणपणी पती, आणि वृद्धावस्थेत पुत्राने रक्षण करावे; तिला एकट्याने सोडणे योग्य नाही’, असे कुणीही न पाहिलेला मनू त्याच्या मनुस्मृती मध्ये म्हणून गेला आणि स्त्रीचे माणूस म्हणून असणारे अस्तित्वच संपले. तिचा स्वतःचे वैयक्तिक जीवन ठरविण्याचा अधिकारच नाकारला गेला. ‘माणूस’ हा शब्द वाचला आणि डोळ्यांसमोर उभा राहिला, तो फक्त ‘पुरुष’च. कारण वर्षानुवर्षे तिची माणूस म्हणून असणारी ओळख इतकी पुसली गेली की ती स्वतःसुद्धा तिला माणसाचा दर्जा देत नाही. बाई म्हटले की, बाई वरून आठवते, ते स्त्रीत्व, पौरुषत्व आणि त्यामागील स्त्री-पुरुषांचे राजकारण, सत्ताकारण आणि त्यांच्याबद्दलचे ग्रह-पूर्वग्रह. बाई-बुवा हे चिंतन संपवताना, ‘माणूस’ हा चिंतनाचा विषय बनतो. म्हणून २१ व्या शतकात ह्या विषयावर विचार करण्याची गरज आहे.

मनुस्मृतीतील ते वचन निभावताना, त्यास सर्व पुरुषांनी त्यांची आद्य जबाबदारी, कर्तव्य म्हणून स्वीकारताना कधी तिला गुलाम केले, हे समजलेच नाही. ‘समाज’ म्हणजे कोण ? तर पुरुष प्रधान व्यवस्था. कोणी, कधी, कुठे, केव्हा काय करायचे हे सर्व ठरवले त्या व्यवस्थेने.

राम आणि सीता दोघेही वनवासात गेले. दोघांचा वियोग समान काळापुरता होता, पण अग्निपरीक्षा फक्त बाईनेच दिली. जगासमोर पावित्र्य दाखवण्यासाठी समाजाने स्वीकारावे म्हणून धरणीत लुप्त झाली ती सीता. रामाला तर कोणी विचारलेही नाही. उलट, अश्वमेधामध्ये तिचा सुवर्णाचा पुतळा करून त्याच्या एकपत्नीव्रताने सीताच महाभाग्यशाली पत्नी झाली. नरकासुराच्या बंधनातून १६१०० जणींना मुक्ती मिळाली आणि जीवनाचे साफल्य मिळाले. त्यांची इज्जत परत मिळाली. मानाचे जीवन मोठ्या उदारतेने ह्या समाजाने दिले कारण एका आदर्श पुरुषाने त्यांचा पत्नी म्हणून स्वीकार केला होता. अहिल्या शापित झाली त्यास कारण इंद्राची वासना होती, पण शिळा फक्त तीच झाली. इंद्र मात्र मुक्तच राहिला. महाभारत झाले कारण एक माणूस म्हणून द्रौपदीवर झालेल्या अन्यायासाठी नव्हे, तर अनेक रथी-महारथींची मर्यादा, शील, कुळाचा गौरव दुखावला गेला. आजपर्यंत हीच परिस्थिती राहिली. फक्त पिढ्या आणि नावं तेवढी बदलत गेली, पण ती आजही स्वतःला सिद्ध करतेय. समाजाने स्त्रीला मर्यादा, इज्जत बनवले आणि एकमेकांच्या द्वेषात लुटले देखील तीलाच. बाई नावाचा स्वतंत्र माणूस आहे, हे विसरून ती कोणाचा तरी मालकी हक्क असलेली प्रॉपर्टी झाली.

स्त्री म्हणजे आदर्श, शांत, संस्कृती – रीतिरिवाज पुढे नेण्याची इच्छा असणारी, सेवावृत्ती, त्याग आणि समर्पणाची मूर्ती हे चित्र पण तयार केले आणि आदर्शासाठी तिला देवी-देवतांचं रूप देऊन एका साचत बंदिस्त करून टाकले. बाई हा माणूस असण्याला समाज मान्यता नसल्याने बाई म्हणजे नक्की काय हे एक बाई खूप सुंदर सांगते.

अगदी थंडपणे आणि अलिप्तपणे स्वप्नवेडया पाखरांची पंखे कापली जातात, मर्यादा, परंपरा, आणि संस्कृतीच्या नावाखाली. … चुका करणे हे माणूस जिवंत असण्याचे लक्षण आहे. देवी-देवतांच्या प्रतिमा त्यांच्या सोयीसाठी असल्याने चुकत नाहीत … आणि बायांना काय अक्कल असते? डोक्यावर चढवायचे नसते … तिने तिच्या मर्यादेत राहावे, म्हणजेच गुलाम. देव आणि गुलाम बनवले आपापल्या परीने, पण तिचे माणूस असणे नाकारले. तिने पतीच्या मृत्यूनंतर सती जावे नाहीतर काळे कपडे घालावे… तिने नंतर फक्त फळाहारावर तिचे जीवन व्यतीत करावे, रंगीत वस्त्रे परिधान करू नये असे सांगून तिच्या आयुष्याचे सारे रंग पुसून टाकायचे म्हणजे काय, तिने जगण्याचा सर्व आनंद सोडून द्यावा आणि जीवन व्यर्थ समजून व्यतीत करावे. आजही फार काही वेगळे चित्र नाही. हा सती आणि काळा वेष गेला तरी, एकटी स्त्री म्हणजे यक्ष प्रश्नच. पुरुषासारखे जगण्याचा सामान अधिकार असायला ती माणूस थोडीच. एक कवयित्री म्हणते, “शरीरावरचे खाचखळगे आणि उंचवटे सोडले तर, मन नामक गोष्ट तशी बाई-बाप्यात असते युनिव्हर्सल…” अखिल मानवजातीचे मन एकसारखेच. स्त्रीमन.. पुरुष मन असे काही वेगळे असते का? त्यांना वेगळे पाडून बाजारू वास्तूचे विक्रेय मूल्य दिले… माणसाचे मन सारखेच असते.. हे बाई नावाच्या माणसाबाबत मात्र घडलेच नाही…

शरीरावरचे खाचखळगे आणि उंचवटे सोडले तर, मन नामक गोष्ट तशी बाई-बाप्यात असते युनिव्हर्सल…

.

उसकी गुलामी को कहा मर्यादा,

हत्या को कुर्बानी,

मौत को मुक्ती,

जल जाणे को सती,

सौंदर्य को 'माया' ठगनी,

खुद्दारी को कुलटा नटनी,

और न जाणे क्या क्या ...

ज्ञान उसके लिए वर्जित

किताबें बन्द

उसकी पहुंच के बाहर

केवल शृंगार की पात्रा

भोग्या

देवी-रूपा दासी

न बोलने वाली गुड़िया

सिर हिलाती कठपुतली

किसी अदृश्य डोर से बंधी

पिता पति भाई पुत्र में बंटी

किसी भी एक के

खूंटे से बंधी..

प्रत्येक जन्माला येणारी व्यक्ती स्वतंत्र असते. तिला मानवाधिकार ह्या युनिव्हर्सल संकल्पनेनुसार माणूस म्हणून असणारे अधिकार सामान असतात. ते त्याला कोणाकडूनही मागण्याची गरज नसते. सर्व मानवी व्यक्ती जन्मतः स्वतंत्र आहेत व त्यांना समान प्रतिष्ठा व समान अधिकार आहेत. त्यांना विचारशक्ती व सदसद्विवेकबुद्धी लाभलेली आहे. दुसरीकडे मात्र, “I am the boss in my house, and my husband permits me to say so!” असे चित्र आहे. प्रत्येकास जगण्याचा, स्वातंत्र्य उपभोगण्याचा, सुरक्षित असण्याचा अधिकार आहे. असे एकीकडे म्हणत असताना, जगभर स्त्री-पुरुष समानतेसाठी लढा द्यावा लागतो; इथेच तिचे माणूस असणे दुर्लक्षित असल्याचे लक्षात येते. कोणताही देश असो किंवा वेष, रंग, हास वेगळे असले तरी तिची वेदना सारखीच आहे. जगभर तिचा संघर्ष स्वतः माणूस असण्याचा अजून तरी संपला नाही. स्त्रियांच्या दबलेल्या अस्तित्वात; पुरुषांच्या नैसर्गिक अस्तित्वाची अचूक रेषा आढळते. महिला सशक्तीकरणाचे वारे जगभर वाहत असताना, आणि अनेक महिला प्रयत्नशील असताना, हे चांगले असले तरी त्या आधी स्वतःला अबला समजतात, हे दुःख आहे. माणूस समजत असत्या तर, महिला सशक्तीकरण हा विषय जगाच्या चिंतेचा विषय राहिला नसता.

गांधीजींनी म्हटले आहे, “बुरा मत देखो, बुरा मत सुनो, बुरा मत कहो”, आणि आदर्श स्त्रीने “कुछ मत कहो, कुछ मत देखो, कुछ मत सुनो” सोबत “कुछ मत सोचो” ह्या तत्वाचा अंगीकार केला आहे. स्त्रियांच्या ह्या स्थितीला त्या स्वतः जबाबदार आहेत कारण तिने हे विचार स्वतःवर बिंबवून घेतले. “तक्रार नाही, खंत नाही, पूर्तीसाठीच प्रवास असतो, केव्हातरी मिटण्यासाठीच काळजामधला श्वास असतो” हे तिने स्वीकारले आहे. तिलाच स्वतःला स्वतःचा उद्धार करावा लागणार आहे. बाई नावाचा माणूस अस्तित्वात येण्यासाठी तिला भावना आहेत, मन आहे हे समजून घ्यावे लागेल. स्त्रीला स्तनांचा आणि योनीचा जोड म्हणून पाहिले जाईल तो पर्यंत बाई नावाचा माणूस अस्तित्वात येणार नाही.