(Originally Published on 04th September 2020 | Language of original article: Marathi)
बारावे शतक महाराष्ट्र आणि मराठी भाषेच्या दृष्टीने देखील महत्वाचे मानले जाते. मराठी भाषेतील पहिल्या चरित्रग्रंथाचे नायक आणि पहिले ज्ञात समाजसुधारक असे श्री चक्रधर स्वामींना मानले जाते. याच काळात मराठीचा पहिला व्याकरणग्रंथ पंडित भीष्माचार्यानी लिहिला होता. आजही ज्या स्त्री-पुरुष समानतेसाठी आपण झगडतोय, जात-शूद्र-अतिशूद्र या संकल्पनांतून बाहेर येण्याऐवजी त्या गर्तेत खोल रुतत चाललो आहे, त्याचं उच्चाटन करण्याचा सफल प्रयत्न ह्या युगपुरुषाने केला. वैदिक परंपरेला नाकारून स्त्री – शूद्र यांना देखील मोक्षाचा अधिकार आहे असं मानून ती तत्व ‘महानुभाव’ या पंथाच्या आणि त्या द्वारे समाजाच्या आचरणात त्यांनी रुजवली.
श्री चक्रधरांच्या वैदिक धर्माहून आणि लोकरुढीहून वेगळ्या शिकवणीमुळे तत्कालीन सनातनी लब्धप्रतिष्ठितांकडून त्यांना विरोध झाला व त्यांना नाहीसे करण्याचे प्रयत्न झाले. महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर हे स्वतः गुजराती भाषिक असले तरी ते मराठी भाषा अविरत बोलत. आपल्या तत्त्वज्ञानाचा मराठी या लोकभाषेत त्यांनी प्रचार केला. त्यांचा हा दृष्टिकोण पंथाचे आचार्य नागदेव यांनी कटाक्षाने आचरणात आणला. त्यामुळे केशिराजांसारख्या संस्कृतज्ञ शिष्यांकडून त्यांनी माठी भाषेत ग्रंथरचना करवून घेतली. महानुभावांच्या मराठीविषयक आत्मीयतेच्या भावनेमुळे या पंथातील व्यक्तींनी विविध वाङ्मयप्रकारांत रचना करून मराठी साहित्य समृद्ध केला आहे. स्मृति-संकलनात्मक गद्य चरित्रवाङ्मय ही या पंथाची मराठी साहित्यास लाभलेली महत्त्वाची देणगी होय.
म्हाइंभट हे मराठीतील आद्य चरित्रकार मानले जातात. धवळे आणि मातृकी रुक्मिणीस्वयंवर रचणाऱ्या चक्रधरशिष्या महदाइसा ह्या आद्य मराठी कवियत्री मानल्या जातात. चौदाव्या ते पंधराव्या शतकांत स्थळ आणि बंद ग्रंथांमुळे मराठी गद्याचे दालन विशेष समृद्ध झाले. बाराव्या शतकाच्या पूर्वार्धात गुजराथमध्ये विशाळदेव आणि म्हाळईसा यांच्या पोटी हरपाळदेव यांचा जन्म झाला. त्या काळात विशाळदेव भडोचच्या राजदरबारात प्रधान होते. तारुण्यात विवाह झाल्यानंतर युद्धात त्यांनी पराक्रम गाजवला. मात्र, बऱ्याचवेळा ते राजवाड्याबाहेर रुग्णांच्या सेवेत रमत असत. पुढे त्यांची प्रकृती अचानक खालवली गेली आणि त्यांचा मृत्यू झाला. परंतु, स्मशानात शरीर ठेवल्यावर हरपाळदेव जिवंत असल्याचे आढळून आले. महानुभावीयांच्या श्रद्धेनुसार, त्या वेळी श्रीकृष्णाने त्यांच्या शरीरात प्रवेश करून अवतार धारण केला. पंचावतारातील तिसऱ्या अवतार श्री चांगदेव यांच्या मृत्यूच्या सुमारास ही घटना घडली. काही मतांनुसार, त्यांच्या आत्म्याने हरपाळदेवांच्या शरीरात प्रवेश केला. हरपाळदेवांच्या शरीरात प्रविष्ट होणाऱ्या आत्म्याला स्वतंत्र ईश्वरी आत्मा मानले जाते. ही
अवतारधारणाची घटना शके ११४२ विक्रम संवत्सर भाद्रपद महिन्याच्या शुक्लपक्षाच्या रविवारी घडली. या घटनेनंतर हरपाळदेवांचे आयुष्य पूर्वीप्रमाणेच सुरू झाले. कालांतराने त्यांना एक पुत्र झाला. त्यांची आजारी लोकांना सेवा देण्याची कार्य तसेच सुरू राहिले. या काळात घडलेल्या घटनांमुळे हरपाळदेव यांना औदासीन्याने ग्रासले आणि लौकिक प्रपंचातून त्यांचे मन उडाले. त्यांनी राजविलासी भोग आणि संसार-सुख यांचा त्याग करून लोकसेवा करण्याचा निर्णय घेतला. गृहत्याग करून त्यांनी सर्वस्वाचा त्याग केला आणि भ्रमण करत असताना ऋद्धिपूर येथे आले. तिथे त्यांना विरक्त अवस्थेतील श्री गोविंदप्रभू भेटले. गोविंदप्रभूंपासून त्यांना शक्ती प्राप्त झाल्या आणि याचवेळी गोविंदप्रभूंनी त्यांना चक्रधर हे नाव दिले. एकाकी भ्रमणाच्या काळात चक्रधरांनी लोकजीवन प्रत्यक्ष पाहिले आणि त्या काळातील सामाजिक व धार्मिक परिस्थितीचे अवलोकन केले. त्यांच्या पुढील ज्ञानदानाच्या कार्याची पूर्वतयारी या काळात झाली.
“महानुभाव” शब्दाचा “महान अनुभवः तेजः बलं वा यस्य” असा अर्थ केला जातो. महानुभव पंथाच्या वैदिक किंवा अवैदिक स्वरूपाबाबत वाद आहे. हा पंथ वेदानुयायी किंवा वेदविरोधी दोन्ही नसून त्याचे स्वतंत्र रूप आहे, असे काही जण मानतात. त्यांचे वेदविरोधकत्व दर्शविताना, पहिले म्हणजे वेद हे कर्मरहित शास्त्र म्हणून त्याज्य आहे, हे चक्रधरांचे मत आहे; दुसरे म्हणजे देवतांची उपासना परमेश्वर प्राप्तीच्या दृष्टीने अप्रमाण आहे; तिसरे म्हणजे चक्रधर वचने हीच महानुभवांची श्रुती असून वेदवचने ते प्रमाण मानीत नाहीत. चक्रधरांनी गीतेवरील भाष्याच्या स्वरूपात पारंपारिक पद्धतीने आपले विचार न मांडता स्वतंत्रपणे मांडले. श्रीकृष्णाला पूर्णावतार मानून, त्यांनी पंचकृष्णांखेरीज इतर देवता क्षुद्र मानले. स्त्री-शूद्रादीकांना संन्यासाचा अधिकार देऊन मोक्षमार्ग सर्वांसाठी खुला केला. पंथीय तत्त्वविचार लोकभाषेत, मराठीत मांडण्यात आले, ज्यामुळे मराठी वाङ्मय समृद्ध झाले. परंतु, संस्कृतज्ञ ग्रंथकारांनी सामान्यांच्या बौद्धिक पातळीचा विचार न करता लेखन केल्यामुळे त्याच्या प्रसारास मर्यादा आल्या.