Blog|Marathi Lekh|Person's In History

मायकेल जॅक्सन: पॉप संगीताचा अनभिषिक्त सम्राट

ज्याला सामान्य प्रेक्षक ते जाणकार समीक्षकांनी डोक्यावर घेतलं, जगाला वेड लावणारा महान कलाकार : मायकेल जॅक्सन नावाचं वादळ.

(Originally Published on 7th August 2020 | Original Language: Marathi)

‘जगाला जर सुंदर जागा बनवायचे असेल तर स्वतःकडे पहा, आणि बदल करा’ असे सांगणारा जागतिक पॉप संगीताचा ‘अनभिषिक्त सम्राट’ असलेला ‘मायकेल जॅक्सन’ म्हणजे करोडोनी पाहिलेली, अनुभवलेली, ऐकलेली दंतकथा.
२९ ऑगस्ट १९५८ रोजी अमेरिकेतील इंडियाना राज्यातील गावी झाला. वडील जोसेफ जॅक्सन यांनी त्यांच्या पाचही मुलांना एकत्र घेऊन ‘जॅक्सन फाइव्ह’ नावाने संगीताच्या कार्यक्रमाची सुरुवात केली. अवघ्या पाच वर्षांच्या मायकेलने त्याच्या गायनाच्या क्षमतेचा प्रत्यय दिला. श्रोत्यांच्या प्रचंड समुदायाला खिळवून ठेवण्याचं त्याचं सामर्थ्य कसबी गायकाला लाजवेल असं होतं. ‘मोटाउन’ या कंपनीने ह्या लोकप्रिय समूहाला ध्वनिफीत मुद्रणासाठी करारबद्ध केले. इसवीसन १९६९ ते १९७१ काळात त्यांनी ६ दर्जेदार गाणी दिली.मायकेलच्या आवाजातही गाणी ध्वनिमुद्रित केली गेली त्याच्या १९७१ मधील ‘I will be there’ या पहिल्याच स्वतंत्र गाण्याने त्या वर्षातील श्रेष्ठ गाण्यांमध्ये चौथं स्थान मिळवलं. १९७८ मध्ये डायना रॉस बरोबर चित्रपटात भूमिका केली व क्विन्सी जोन्स या सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शकासोबत त्याची ओळख झाली. १९७९ मध्ये त्यांनी ‘Off the Wall’ हा संग्रह प्रसिद्ध केला. सामान्य प्रेक्षक ते जाणकार समीक्षकांनी त्याला डोक्यावर घेतलं आणि मायकेल जॅक्सन नावाचं वादळ संपूर्ण जगभर पसरलं… १९८२ मधील ‘Thriller’ या संग्रहाने नवा विक्रम केला, ४ कोटींपेक्षा अधिक प्रती खपल्या. प्रतिष्ठेचे आठ ग्रॅमी पुरस्कार या संग्रहाला लाभले.. हा विक्रम फक्त मायकेलच करू शकला. ‘जर तुम्हाला शिकायचं असेल तर त्या क्षेत्रातील महान व्यक्तींना प्रत्यक्ष काम करतांना बघा.’ असे सांगत त्याच्या कलेच्या उपासनेचा स्त्रोत तो अनुभवाला, निरीक्षणाला दर्शवतो.

MTV ह्या चॅनेलची नुकतीच सुरुवात झालेली होती. गीत आणि नृत्याचा एकत्रित अविष्कार असणारी ‘बिली जीन’, ‘बीट इट’, आणि ‘थ्रिलर’ ने नवीन माध्यमाची सुरुवात केली. त्याच्या नृत्यकला, आणि आवाजाने संपूर्ण जगावर राज्य केले. पॉप संगीतात त्या नंतर अनेक आले परंतु ‘मायकेल जॅक्सन’ आणि त्याचे संगीतातील योगदान मात्र ‘न भूतो न भविष्यन्ति’ असेच होते.

‘या जगात येतांना तुम्हाला माहित असेल कि तुम्हाला प्रेम लाभणार आहे, आणि सोडतानाही हीच जाणीव असेल तर मधल्या सर्व गोष्टीं तुम्ही साकारू शकतात.’ असे सांगणारा, जगाला वेड लावणाऱ्या ह्या महान कलाकाराचा मृत्यूच कारण त्याचा वैयक्तिक डॉक्टर ठरला. वयाच्या पन्नासाव्या वर्षी २५ जून २००९ रोजी त्याने जगाचा निरोप घेतला. मात्र विसावे शतक आणि जगाच्या ज्ञात इतिहासातील दुसरे सहस्त्रक सरले पण त्याची जादू आजही तशीच आहे.