Marathi Lekh

‘या सम हाच’: पु.ल. देशपांडे

"दुनियेच्या बाजारपेठेत ते मनमुराद वावरले, पण काळजातील बुद्ध कधी काजळला नाही," असं सार्थ वर्णन कवी कुसुमाग्रजांनी ज्यांच्याबद्दल केलं, ते जिवंत आख्यायिका आणि भारतातील दूरदर्शनचे पहिले प्रोड्युसर, सर्व माध्यमांतून महाराष्ट्राला खळखळून हसवणारे लाडके पु.ल. लेखन, नाट्य, अभिनय, दूरचित्रवाहिनी, स्वतंत्र महाराष्ट्राच्या लढ्यातील योगदान, अभिनव प्रयोग करणारे कलावंत, समाजकार्य करणारे, असे अनेक पैलू ज्यांच्या कार्यक्षेत्राच्या कक्षा रुंदावतात त्यांच्याबद्दल.

“दुनियेच्या बाजारपेठेत ते मनमुराद वावरले, पण काळजातील बुद्ध कधी काजळला नाही,” असं सार्थ वर्णन कवी कुसुमाग्रजांनी ज्यांच्याबद्दल केलं, ते जिवंत आख्यायिका आणि भारतातील दूरदर्शनचे पहिले प्रोड्युसर, सर्व माध्यमांतून महाराष्ट्राला खळखळून हसवणारे लाडके पु.ल. यांचा आज स्मृतिदिन आणि जन्मशताब्दी वर्ष देखील आहे.

‘भाई’, ‘पुलं’ म्हणूनच प्रेमाने ज्यांना अवघा महाराष्ट्र ओळखतो, ते पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांचा जन्म ८ नोव्हेंबर १९१९ रोजी मुंबईतील गावदेवी येथे झाला. पार्ले टिळक विद्यालयातील शिक्षणानंतर पु.लं. देशपांडे यांचे शिक्षण मुंबईतील इस्माइल युसुफ कॉलेजातून आणि सरकारी लॉ कॉलेज मधून LLB झाले. पुण्याला आल्यावर पु.लं.नी फर्ग्युसन कॉलेज मधून B.A. आणि M.A. केले. अष्टपैलू अशा या व्यक्तिमत्वाचा प्रवास अवघ्या काही शब्दात उलगडणं तसं कठीणच. पण लेखन, नाट्य, अभिनय, दूरचित्रवाहिनी, स्वतंत्र महाराष्ट्राच्या लढ्यातील योगदान, अभिनव प्रयोग करणारे कलावंत, समाजकार्य करणारे, असे अनेक पैलू ज्यांच्या कार्यक्षेत्राच्या कक्षा रुंदावतात त्याचा थोडक्यात आढावा घेणे केवळ अशक्यच.

इसवीसन १९३८ पासून आकाशवाणीवर सक्रिय पुलंचं पाहिलं व्यक्तिचित्र ‘अभिरुची’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालं. फर्ग्युसन मध्ये असतानाच नाट्यक्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटवायला सुरुवात केली. ‘तुका म्हणे आता’ हे पहिलं नाटक, ‘बिचारे सौभद्र’ हे प्रहसन लिहिलं, ‘कुबेर’ हा त्यांचा पहिला चित्रपट ज्यात त्यांनी अभिनय केला. त्यानंतर चित्रपट क्षेत्रात त्यांनी काम केले ‘वंदे मातरम्’, ‘मानाचं पान’, ‘देव पावला’, ‘दुध भात’, ‘नवरा –बायको’, ‘पुढचं पाऊल’, ‘वर पाहिजे’, ‘जरा जपून’, ‘गोकुळचा राजा’ अशा चित्रपटांत लेखन, पटकथा, गीत, संगीत आणि अभिनय यापैकी विविध भूमिका पार पाडल्या आणि ‘गुळाचा गणपती’ या चित्रपटाची निर्मिती केली. परंतु ते दीर्घकाळ त्यात रमले नाहीत.

नाट्य क्षेत्रात मात्र त्यांचा अखंड ठसा त्यांनी उमटवला. जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचे ‘पिग्मालियन’ चे ‘ती फुलराणी’ हे रूपांतरण तर मराठीचा मानबिंदू. त्यांनी मराठीशी त्याला असं जोडलं की आजही ते रुपांतरण आहे हे अनेकांना ठाऊक नाही. असामान्य नकलाकार आणि अभिनयाची कला असणाऱ्या पुलंनी रंगमंचावर दशकभर एकापात्रीचे प्रयोग केले आणि महाराष्ट्रात ‘बटाट्याची चाळ’, ‘वार्यावरची वरात’, ‘असा मी असामी’ ने नवचैतन्य निर्माण झालं. नकल, संगीत, अभिनय यांची सरमिसळ असणारा ‘वटवट’ हा यातील शेवटचा प्रयोग.

‘आकाशवाणी’ वरील नोकरी करत असताना त्यांना ‘युनेस्को’च्या शिष्यवृत्तीवर ‘मिडिया ऑफ मास एज्युकेशन’ चा अभ्यासासाठी आणि दूरदर्शनासाठी ‘बीबीसी’ मध्ये प्रशिक्षित होण्यासाठी इंग्लंडला पाठवण्यात आले. आणि भारतातील दूरदर्शनाचे पहिले प्रोड्युसर म्हणून त्यांची नेमणूक झाली.

त्यांचे साहित्यातील योगदान खूप मोलाचे आहे. अनुवाद, नाट्य रूपांतरण, ‘वयं मोठे खोटे’, ‘नवे गोकुळ’ हे बाल नाट्य, गांधीजींचे चरित्र, अशा अनेक विषयांत वैविध्यपूर्ण लेखन त्यांनी केलं. ‘नाच रे मोरा’ सारखं बालकाव्य लिहून आणि चाल देऊन चिमुकल्यांच्या विश्वात अजरामर केलं. सलग सहा वेळा ते राज्यशासनाच्या पुरस्काराचे मानकरी ठरले. तर १९६६ मध्ये ‘व्यक्ती आणि वल्ली’ साठी त्यांना ‘साहित्य अकादमी’चा पुरस्कार प्राप्त झाला, याच वर्षी भारत सरकारने ‘पद्मश्री’ने त्यांना सन्मानित केले. ‘सुवर्णमहोत्सवी साहित्य संमेलनाचे’ अध्यक्षपद देखील त्यांनी भूषवलं.

पुलंनी कधी महाराष्ट्राला खळखळून हसवलं, तर कधी हसता हसता रडवलं, पण विनोदाला हत्यार म्हणून वापरलं नाही. निखळ, निर्मळ विनोद हिच खरी त्यांची ताकद होती. प्रसंगी ठोस राजकीय भूमिका पण घेतल्या, बाळासाहेबांनी ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सुरू केला व पहिला पुरस्कार पुलंना घोषित झाला. त्यावेळीही फक्त पुरस्काराला जितक्या नम्रतेने स्वीकारले तितक्याच कडकपणे ‘ठोकरशाही’चा पण समाचार घेतला.

महाराष्ट्राचे लोकप्रिय व्यक्तिमत्व, अष्टपैलू कलावंत ज्यांना कोणती एकच उपमा देता येत नाही, फक्त ‘या सम हाच’ असे म्हणू शकतो. निष्कलंक, नम्र, सज्जन, तितकेच उदार असे हे व्यक्तिमत्व पुणे येथे १२ जून २००० रोजी अनंतात विलीन झाले. त्यांच्या निवडक कथासंग्रह, लेखनसंग्रह आणि कादंबरी यांच्या शीर्षकावरून तयार केलेली ही आदरांजली.

‘एक शून्य मी’ म्हणत,

‘कोट्याधीश’ पु. ल. नी,

समाजातील,

‘व्यक्ती आणि वल्ली’ची ‘खिल्ली’ उडवून,

परंतु ‘आपुलकी’ने ‘गोळा बेरीज’ केली….

‘भाग्यवान’ आपल्याला

पु. ल.नी, ‘चार शब्द’ सांगत,

वाचकांची ‘दाद’ मिळवत,

संपूर्ण महाराष्ट्राच्या मनात,

विनोदाचा ‘गाठोड’ ठेवून ‘हसवणूक’ केली…

काव्य – योगेश जोशी