“Love many things, for therein lies the true strength, and whosoever loves much performs much, and can accomplish much, and what is done in love is done well.” (“अनेक गोष्टींवर प्रेम करा, कारण यातच खरी ताकद आहे, आणि जो कोणी जास्त प्रेम करतो तो बरेच काही करू शकतो, आणि कामगिरी करू शकतो, आणि प्रेमाने केलेले काम चांगले होते,”) असे म्हणत आयुष्यभर जगावर खरखुरं प्रेम करणारा, प्रत्येक गोष्टीत जगाच्या भल्याचा विचार करणारा, ज्याची छोट्यातून छोटी कृतीही कोणत्याही उदात्त विचाराने भरलेली असते, अशा एका महान चित्रकाराचा, व्हिन्सेंट व्हॅन गॉगचा जन्म १८५३ मध्ये झाला. जन्माने डच असलेला हा चित्रकार बेताची आर्थिक परिस्थिती आणि कुरूप रूप असलेला होता. संपूर्ण आयुष्यभर प्रत्येक बाबतीत प्रतिकूल परिस्थितीचा सामना करणाऱ्या या कलाकाराचं एकच भांडवल होतं, ते म्हणजे त्याची भावनाप्रधानता, निसर्ग, माणूस आणि जगाबद्दलचं निरतिशय प्रेम.
तो पॅरिस येथील चित्रविक्रेता गुपिल याच्या हेग येथील शाखेत चित्रविक्रेता म्हणून काम करत होता. तेथील त्याच्या उत्तम कामामुळे त्याला लंडन येथील शाखेत पाठविण्यात आले. रेम्ब्राँट, कोरो, मिलेट या चित्रकारांची चित्रे त्याला आवडत असत. तिथे झालेल्या प्रेमभंगानंतर ती नोकरी सोडून तो एका शाळेत फ्रेंच भाषा शिकविण्याचं काम करू लागला. त्यावेळी मुलींच्या पालकांकडून निवास आणि भोजन शुल्क वसूल करीत असताना गरिबीचा त्याचा जवळचा संबंध आला. दुर्दैवाने शेवटपर्यंत त्याची साथ सोडली नाही. आधीच अत्यंत भावनिक असलेल्या व्हॅन गॉगला वसुली करण्याचं काम कठीण जाऊ लागलं. ते काम व्यवस्थित न करू शकल्याने त्याला काढून टाकण्यात आले. लंडन येथे फ्रेंच शिक्षकाची नोकरी सोडल्यावर त्याने धर्मोपदेशाचं काम करण्याचा प्रयत्न केला. अर्धे – उपाशी पोट, असहाय्य, दु:खी-दरिद्री आयुष्य हे सारं जवळून पाहत असताना धर्मोपदेशाचा काही उपयोग नाही ही गोष्ट त्याला अधिक प्रकर्षाने जाणवली. तीच अस्वस्थता त्याला मन:शांतीच्या शोधाकडे प्रवृत्त करणारी ठरली.
धर्मग्रंथ विकणाऱ्या दुकानात काम करू लागलेल्या गॉगला पादरी बनायचे होते पण पदवीधर नसल्याने ते शक्य झाले नाही. तो खाणकामगारांना धर्मोपदेश करण्यासाठी बोरीनाज येथे गेला, तिथे स्वतः संसर्गजन्य रोग्यांची सेवा करत असे… लोकांना मदत करण्यासाठी तो स्वतः अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत राहत होता, हे घरी कळल्यावर त्याला परत बोलावून घेतले. ह्या गोष्टी मात्र त्याच्या चित्रांचा अविभाज्य भाग बनले हे मात्र खरे. त्याचं एक उदाहरण म्हणजे ‘पोटॅटो ईटर्स’ हे चित्र. ह्या त्याच्या जगप्रसिद्ध चित्रात गरीब निर्धन लोक दिव्याच्या प्रकाशात बटाटे खात आहेत. रूढ पद्धतीप्रमाणे त्यात तसे सौंदर्य वाढविणारे ना रंग आहेत, ना त्यातील दृश्य. सौंदर्यशास्त्राच्या नियमांच्या अगदी विरुद्ध जाणारे म्हटले तरी काही वावगे ठरणार नाही. आकर्षक रंग, वेषभूषेच्या ऐवजी डच कलेतील काळे, करडे, हिरवे रंग त्यात आहेत. तर राकट झालेले हात, हावभाव, रूप – कपडे साऱ्यात भरभरून असलेलं दारिद्र्याचं चित्रण म्हणजे ‘पोटॅटो ईटर्स’. अभिव्यक्तीचा अत्यंत उत्कृष्ट नमुना. आश्चर्य म्हणजे, ‘मानवी जीवनाच्या सत्याचे दर्शन म्हणजे कलेचा, अभिव्यक्तीचा आत्मा’ ह्या उक्तीला सार्थ ठरवणाऱ्या व्हॅन गॉगने वयाच्या २७व्या वर्षापर्यंत चित्र काढलेले नव्हते.
नोकरी धरसोड, तर कधी धर्मोपदेशक अशा कामांत ५-६ वर्षे गेल्यावर एकदा व्हॅन गॉगने त्याच्या लहान भावाला पत्राद्वारे कळवलं होतं की तो चित्र काढू इच्छितो. व्हॅन गॉगवर शेवटपर्यंत जर कोणी नितांत प्रेम केलं असेल तर ते थिओने. त्याने त्याला आर्थिक सहाय्य दिले आणि आपल्याजवळ बोलावून घेतले. तिथून त्याच्या कलेच्या तपश्चर्येला सुरुवात झाली. संग्रहालयात जाऊन रेम्ब्राँटच्या चित्रांचा अभ्यास करणे आणि सराव करणे हा त्याचा नित्यक्रम झाला होता. त्या काळातील त्याची चित्रे स्वच्छंद, सरळ होती. १८८०-१८८६ मधील या चित्रांचा विषय मानवतावादी अधिक होता. फ्रांस ते लंडन आणि प्रेमभंगानंतर त्याने जे जीवन जवळून पाहिलं त्याचा प्रभाव या चित्रांवर होता. खाणकामगार, तिथल्या वस्त्या, जीवनपद्धती हे या काळात कागदावर उमटत होतं.
दुसऱ्यांदा पुन्हा एक स्त्री त्याच्या आयुष्यात आली. दोन्ही प्रेमभंगात त्याच्यातील कलाकाराने व्यक्त होण्याच्या परिभाषा बदलल्या. एका गर्भवती वेश्या स्त्रीला मदत करण्यासाठी म्हणून तो घरी घेऊन आला त्यावेळेचे त्याचे चित्रण म्हणजे मानवी मनाच्या कल्लोळाचे रेखाटन होते. ‘दुःख’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या ह्या रेखाचित्रणात तिच्या शारीरिक आणि मानसिक अवस्थेला त्याने प्रतिबिंबित केले आहे. वास्तवापासून दूर जाऊन सौंदर्याला समजून घेता येत नाही. कलेला, रंगांना अभिव्यक्तीचे माध्यम म्हणून वापरताना ही गोष्ट आपल्याला प्रकर्षाने जाणवते. कलाकृतीच्या बाह्यरूपापेक्षा त्यामागे असणाऱ्या भावना त्याच्यासाठी महत्वाच्या असतात. थिओला (त्याचा लहान भाऊ) लिहिलेल्या एका पत्रात तो म्हणतो, देखील की ‘पाहणाऱ्यांना सगळ्यांना हे चित्र आवडेलच असं नाही पण पारंपरिक पद्धतीने त्या चित्राला आकर्षक बनविणे योग्य होणार नाही.’ माणसाचे खरे आयुष्य, भावभावनांचे कंगोरे यांना व्यक्त करण्याचे माध्यम त्याची कला होती. पॅरिस मधील कलेला पोषक वातावरण, थिओचे प्रोत्साहन यामुळे त्याच्यातला कलाकार बहरू लागला होता. त्या काळातील त्याची चित्रे ही अधिक कलात्मक, रंगीत आहेत. डच शैलीच्या गडद हिरव्या-करड्या रंगांच्या जागेवर निळे, पिवळे रंग उमटू लागले होते. पिसारो, सिस्ले, पॉल गागुईन, तुलूझ लॉट्रेक यांच्या सहवासात, विचारांच्या देवाणघेवाणीत त्याने स्वतःची वेगळी शैली निर्माण केली. चित्रांच्या रंग, सौंदर्य आणि इतर कलात्मक आणि सौंदर्याच्या गुणधर्मांना तो अभ्यासपूर्वक स्थान देऊ लागला होता. याच काळात त्याने अँटवर्प येथे रुबेन्सची चित्रे आणि जपानी प्रिंट पहिले. होकुसाईची ‘थर्टी-सिक्स व्ह्यूज ऑफ माउंट फुजी’ ही चित्रमालिका त्याच्या पाहण्यात आली. व्हॅन गॉगवर असलेला पूर्वेकडील विशेषतः जपानी कलेचा प्रभाव चित्रांतून जाणवतो.
एकांतप्रिय असणारा व्हॅन गॉगला इतर चित्रकारांसोबत चर्चा करणे, वादविवाद करणे प्रचंड आवडे. त्यातूनच नवनिर्मितीला मदत होईल असे त्याचे मत होते. पॅरिस सोडून आर्लेस येथे गेल्यावर देखील त्याने अशा चर्चा व्हाव्या, मित्रमंडळ जमावे म्हणून प्रयत्न केला. परंतु पॉल गागुईन वगळता कोणीही त्याच्या निमंत्रणाचा प्रतिसाद दिला नाही. एकत्र जमल्यावर दोघेही अनेक विषयांवर चर्चा करत, मत मांडत. एखादी वस्तू किंवा मॉडेल ठेवून चित्र काढण्याला तो प्राधान्य देत असे, ह्याच गोष्टीवरून त्याचे आणि पॉल गागुईन या चित्रकारात मतभेद झाले होते. प्रत्यक्ष वस्तू पाहून चित्र काढण्यापासून व्हॅन गॉगला परावृत्त करण्याचा त्याने खूप प्रयत्न केला. परंतु आपल्या कलेतून निर्जीव वस्तूला देखील सचेतन करण्याची, ओळख देण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्हॅन गॉगला ते ऐकणे आणि अंमलात आणणे शक्य होत नव्हते. पॉल गागुईनबद्दल गॉगला प्रचंड आदर होता. आपल्या कलेचे श्रेय तो त्याला देत असे. पॉल गागुईनला व्हॅन गॉगचा कलात्मक दृष्टिकोन माहित होता परंतु तरीही त्यांच्यात झालेल्या वादांत एकदा त्याने स्वतःचा कान कापून घेतला असं सांगितले जातं. कानाला बँडेज केलेलं त्याचं स्वतःचं चित्र अनेकदृष्टीने आजही महत्वाचे आहे.
थिओ आणि पॉल गागुईन यांच्याव्यतिरिक्त आणखी काही लोकांना व्हॅन गॉगच्या चित्रनिर्मितीचे श्रेय जाते. पेर तांग्वी हा त्यापैकी एक होता. पॅरिस कालीन चित्रांतील हे एक प्रसिद्ध व्यक्तिचित्र आहे. हा एक व्यापारी होता. त्यांच्या दुकानात दृष्टिकोणवादी (इम्प्रेशनिस्ट) चित्रकारांचा समूह जमत असे, त्यांच्याबरोबरच्या चर्चांत तांग्वी सामील होत असे. त्याने ह्या कलाकारांची चित्रे विकत घेतली होती. ज्यांच्याजवळ पैसे नसत त्यांना चित्राच्या बदल्यात ब्रश, कॅनव्हास, रंग हे साहित्य देत असे. व्हॅन गॉग, सिस्ले, मोने या गरजवंतांना याची खूप मदत झाली त्या अर्थाने त्याची मदत ही कलाविश्वावर उपकारच ठरली असं म्हणायला हरकत नाही. पुढे पॅरिस सोडून तो आर्लेस शहरात स्थायिक झाला. आयुष्यातील ही शेवटची दोन वर्षे त्याच्या कलानिर्मितीतील सर्वात महत्वाची होती. ह्या काळात त्याने झपाटल्यासारखी चित्रे काढली. यातील बहुतांश चित्रे त्याच्या सर्वोत्कृष्ट कलाकृती म्हणून मान्यता पावली. पूर्वीच्या डच आणि पॅरिस मधील कलाकृतींपेक्षा भिन्न अशा कलाकृतींची निर्मिती या काळात केली. दृष्टिकोणवादाच्या प्रभावातून तो बाहेर आला. रंगांशी खऱ्या अर्थाने खेळला तो इथेच. रंगांना प्रतीकात्मक स्वरूप त्याने या काळात दिले. प्रत्येक रंग कोणत्यातरी भावनेचे प्रतीक असतो. चित्राच्या गरजेनुसार रंगांची भाषा त्याने कॅनव्हासवर उतरवली. लाल रंग उत्कटता, प्रेम तर निळ्या रंगात शांतता, गहिरेपणा, खोली, पिवळ्या रंगछटांमधून प्रसन्नता, आशा व्यक्त होतात. ‘स्टारी नाईट’ हे त्याचं चित्र याचं उत्तम उदाहरण आहे. “I often think that the night is more alive and more richly colored than the day.” – व्हिन्सेंट व्हॅन गॉग (डच, १८५३–१८९०), १८८९. ऑइल ऑन कॅनव्हास,
शारीरिक थकव्याला न जुमानता वेड्यासारखी दिवसरात्र चित्रे काढणं ही त्याची सवय झाली होती. या काळात त्याने असंख्य अशा चित्रांची निर्मिती केली. आत्मसमर्पण आणि पूर्णपणे गढून जाणं, कामात एकरूप होणं हे जरी कलानिर्मितीला पोषक होतं तरी त्याचा दुष्परिणाम फार भयानक होता. आधीच एकटेपणाच्या गर्तेत अडकलेला व्हॅन गॉग वेडा झाला. या बाबत थिओला समजल्यावर तो व्हॅन गॉगला भेटण्यास आला. त्याला वेड्यांच्या इस्पितळात भरती करण्यात आले. इथेही त्याने अनेक चित्रे काढली. त्याला या अवस्थेतून बाहेर काढण्याचे थिओने अतोनात प्रयत्न केले. पत्रांमधून कधी त्याचं चित्र विकले गेल्याची बातमी तर कधी त्याला मुलगा झाला अशा छोट्या-मोठ्या आनंदाच्या घटना कळवून त्याने त्याला पुन्हा उभं करण्याचा प्रयत्न केला. त्याला काही अंशी यश पण आलं. हॉस्पिटलमधून सुटका होऊन तो डॉ. गाशेंकडे राहायला गेला. चित्र आणि चित्रकारांबद्दल आत्मीयता असणाऱ्या डॉक्टरांच्या सहवासात व्हॅन गॉग पुन्हा नव्याने उभा राहिला. डॉ. गाशेंचे (१८९०) चित्र त्याने काढले. त्यांच्या बागेचे, नदीकाठचे, शेताचे चित्र काढले. एकेदिवशी असेच चित्र रेखाटत असताना त्याने स्वतःवर गोळी झाडून घेतली. थिओला लिहिलेली पत्रे, त्यावरील थिओची उत्तरे म्हणजे व्हॅन गॉगच्या संपूर्ण आयुष्याचा लेखाजोगा होता असं म्हणायला हरकत नाही. चित्रांबद्दल, त्याच्या मनातील गोंधळांबद्दल, एखाद्या नव्या प्रेरणेबद्दल जितकं भरभरून व्हॅन गॉगने लिहिलं तितकंच संयमाने थिओने समजून घेतलं. प्रत्येक पायरीवर त्याला प्रोत्साहन देणं. त्याच्या कलाकृतीमागचे भाव समजून घेणं आणि शक्य त्या प्रत्येक पद्धतीने त्याला मदत करणं यामुळेच व्हॅन गॉगसारखा चित्रकार जगाला मिळाला. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्याला जगवण्यासाठी, प्रेरणा देण्यासाठी थिओ झटला.
विषयाचं, स्थळ-काळाचं बंधन नसलेली त्याची चित्रे मात्र सगळी भावनांना साद घालणारी होती, भले मग ती वस्तूचित्रे का असेनात. फुलदाणी, बूट अशा निर्जीव वस्तूंमध्येही त्याने त्याच्या चित्रांतून भावना ओतल्या. सौंदर्य हे वस्तूत नसून पाहणाऱ्याच्या नजरेत असते, कलाकृतीच्या निर्मितीसाठी सुंदरच काहीतरी समोर असावे असे काही नाही हे त्याने दाखवून दिले. त्याच्यामुळेच कलेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला हे मात्र नक्की. वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी चित्र निर्मितीला सुरुवात केलेल्या व्हॅन गॉगने ९०० हून अधिक पेंटिंग्ज आणि असंख्य रेखांकने केली. फक्त १० वर्षांतील त्याची ही कारकीर्द पाहता त्याने प्रत्येक छत्तीसाव्या तासाला एक या प्रमाणात चित्रांची निर्मिती केली असं मानावं लागते. चित्रांच्या व्यतिरिक्त वाचन आणि पत्रे लिहिणे हा देखील त्याच्या आयुष्यातील महत्वाचा भाग होता. त्याने लिहिलेल्या पत्रांतच बहुतेक त्याच्या महान कलाकृतींचे चित्राचे कच्चे रेखाटन आढळते. आर्थिक विवंचनेत असलेला हा चित्रकार स्वतःच मॉडेल बनून स्वतःची चित्रे रेखाटत असे. अनेकदा नवीन कॅनव्हास घ्यायला शक्य नाही म्हणून जुन्याच चित्रांवर नवीन रेखाटने केली असं म्हटलं जाते. किती दुर्दैव आपलं, न जाणे किती मोठ्या ठेव्याला आपण मुकलो असावो. कलेचे कुठलेही शास्त्रीय शिक्षण त्याच्याजवळ नव्हते किंवा प्रचलित कला शैली, त्याबाबतचे नियम, सिद्धांत यातही तो कधी अडकला नाही. स्वतःच्या भावनांचा कल्लोळ आणि त्याच्या नजरेतून दिसणाऱ्या जगाला व्यक्त करण्यासाठी त्याने चित्रे काढली. त्याच्या चित्रांबद्दल युईद हा समीक्षक म्हणतो की ती ‘एकट्या हृदयाची गोष्टी आहेत.’ त्याचं वैयक्तिक आयुष्य आणि अनुभव यांना त्याच्या कलाकृतींपासून वेगळे करणे हे अशक्य आहे.
जगातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे ‘सत्य’ असं मानणारा व्हॅन गॉग हा अत्यंत मानवतावादी होता. प्रेम आणि दु:ख हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, त्यांना एकमेकांपासून वेगळे करता येत नाही आणि हीच गोष्ट त्याच्या जीवनाचे सार होती. अखेरच्या क्षणापर्यंत देण्याच्या भावनेने भरलेले, आतून पूर्णपणे एकटे असले तरी अतोनात प्रेम असणारे त्याचे हृदय, प्रत्येक गोष्टीला सामावून घेणे, एकरूप होऊन जाणे, आजूबाजूला होणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा ठाव घेणे हे वैशिष्ट्य आणि दु:खात होरपळणारा त्याचा आत्मा ह्यांतून जे काही निघालं त्या जगातील सर्वोत्कृष्ट कलाकृती होत्या. स्वतःला कधीही जीवनकाळात यशस्वी मानले नसलेल्या या कलाकाराचं तो हयात असताना फक्त एकच चित्र विकलं गेलं होतं, ते देखील थिओने आपल्या मित्राला घेण्यासाठी लावलं होतं. मृत्यूनंतर आज अमूल्य ठरलेला तो ठेवा आणि त्याच्यामुळे प्रेरणा मिळून काम करणारी लोके, चित्र काढणाऱ्या पिढ्यांनी त्याला दाखवता येता आलं असतं. त्याने जगावर, माणसावर भरभरून प्रेम केलं. परंतु प्रेमाच्या बदल्यात प्रेम मिळावे अशी अपेक्षा त्याने केली नाही. तो जिवंत असताना त्याच्या वाट्याला लोकांचे फारसे प्रेम आले नाही. आयुष्यभर प्रेमासाठी आसुसलेल्या त्याच्यापर्यंत ह्या दोनशे वर्षांत भरभरून प्रेम करणारी लोके आणि त्यांच्या भावना पोहोचवता आली असती. त्याला जर ही गोष्टी त्यावेळी मिळाल्या असत्या तर कदाचित तो वेडा झाला नसता. वेडापणाच्या झटक्यात त्याने स्वतःच्या छातीत गोळी चालवून घेतली आणि त्याचा शेवट दु:ख आणि वेदनेत झाला. गोळी झाडून घेतल्यानंतर दोन दिवसांनी, म्हणजेच २९ जुलै रोजी, हा महान कलाकार अनंतात विलीन झाला. आयुष्याच्या अखेरच्या काही वर्षांत सर्वस्व गमावलेल्या त्याला वेदनेने मात्र शेवटपर्यंत साथ दिली. शेवटचे हे क्षण त्याने त्याच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या थिओसोबत घालवले. असे म्हणतात की त्याचे शेवटचे शब्द होते, ‘the sadness will lasts forever..’ (‘दु:ख कायमचे राहील…’)