
“पोथी पढ़ि पढ़ि जग मुआ, पंडित भया न कोय, ढाई आखर प्रेम का, पढ़े सो पंडित होय।”
खूप मोठे मोठे ग्रंथ वाचून लोक मृत्यू पावले, पण सर्वजण विद्वान झाले नाहीत. पण, ज्याने कोणी प्रेम किंवा ‘प्यार’ हे अडीच अक्षर समजून घेतले, म्हणजेच प्रेमाचे खरे रूप समजून घेतले, तोच खरा विद्वान आहे. हे म्हणणारे कबीर हे एक महान संत भारतात होऊन गेले आहेत. सातशे वर्षांनंतरही त्यांचे शब्द व विचार जुने झालेले नाहीत. बदलत्या काळातही ते तितकेच चपखल बसतात.
मराठी साहित्यात तुकोबा असे, तर हिंदी साहित्यात संत कबीर असा लौकिक आहे. त्यांचा जन्म सुमारे इ.स. १३९८ आणि मृत्यू १५१८ च्या दरम्यान झाला असे म्हणतात. जन्म, मातापिता, त्यांचे गुरु याबाबत फार माहिती उपलब्ध नाही व बरीच मतमतांतरे आहेत. ‘आई एक ब्राह्मण विधवा स्त्री होती, पण जनमानसाच्या भीतीने तिने कबिरांना काशीजवळील एका तलावाजवळ सोडले, पुढे त्यांचा सांभाळ नीरु नामक एका कोरी या जोडप्याने केला’ अशी आख्यायिका सर्वसामान्यात प्रसिद्ध आहे. पुढे हेच कबीर एक महान संत झाले.
“जाति न पूछो साधु की, पूछ लीजिये ज्ञान, मोल करो तरवार का, पड़ा रहन दो म्यान।”
त्यांच्या या दोह्याप्रमाणेच त्यांच्याबद्दलच्या इतर मतमतांतराची वलये त्यांच्या संतत्वापुढे आणि कार्यापुढे क्षुल्लक वाटतात. कुठल्याही कट्टरवादामुळे समाजाची कशी अधोगती होते, याची त्यांना जाण होती. त्यामुळे ते जातीभेद, पंथ, धर्म याच्या दुराभिमानाबद्दल टीका करतात.जगभर जेव्हा वर्णभेद, वंशभेद, भाषा, प्रांत, धर्म, पंथ-जाती या भेदांनी आपण ग्रासलो आहोत आणि अजूनही आपल्या कृत्यांनी दुराभिमानाने जेव्हा त्या दलदलीत रुतत जात आहोत, त्यावेळी हा मानवतेचा पुरस्कार करणारा हा महान संत आणि त्याचे विचार एकविसाव्या शतकातही दिशादायक आहेत.

“हिन्दू कहें मोहि राम पियारा, तुर्क कहें रहमाना, आपस में दोउ लड़ी-लड़ी मुए, मरम न कोउ जाना।”
कबीर म्हणतात, हिंदू रामभक्त आहे तर मुस्लिमांना रहेमान प्रिय आहे. राम-रहीम वरून भांडत दोघे मरतात पण शेवटपर्यंत त्यांना त्याचा खरा अर्थ उमजत नाही. यावरून त्यांच्या विचारांची प्रचिती आणि गरज लक्षात येते.