“वैकुंठ ते घर | सांडूनिया निरंतर ||१||
तो हा पुंडलिक द्वारी | उभा कर कटावरी ||२||
क्षीरसागरींची मूर्ती | तो हा रुक्मिणीचा पती ||३||
नये योगियांचे ध्यानी | छंदे नाचतो कीर्तनी ||४||
नामा म्हणे आला | सर्व परिवार आणिला ||५||”
आषाढी वारी म्हणजे वारकरी भक्तांनी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरपर्यंत केलेली पदयात्रा. वारीच्या या आनंद सोहळ्याचे एक वैशिष्ट्य म्हणजे इथे येणारा प्रत्येक माणूस फक्त ‘वारकरी’ असतो, तो कोणत्याही जातीचा किंवा धर्माचा नसतो. भक्ती आणि समर्पण ही त्याची ठळक ओळख असते.
लाखोंच्या संख्येने जमणाऱ्या भक्तांची अत्यंत शिस्तीने पार पडणारी ही वारी म्हणजे महाराष्ट्राची एक सांस्कृतिक परंपरा. आळंदी येथून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका आणि देहू येथून संत तुकाराम महाराजांच्या पादुका पालखीत ठेवून त्या पंढरपूरात येतात, हा पालखी सोहळा म्हणजे वारीचे आकर्षण. वारीचा हा इतिहास जुना आहे. संत ज्ञानदेवांच्या घराण्यात वारीची परंपरा असल्याचे उल्लेख आढळतात. वारकरी धर्म म्हणजेच भागवत धर्म. ही भागवत धर्माची पताका सर्व थरातील लोकांना एकत्र करून ज्ञानदेवांनी फडकवली. पुढे संत तुकाराम, संत एकनाथ आणि इतर संतश्रेष्ठांनी व वारकरी संप्रदायाने पुढे चालवली.
आमुचे मिरासी पंढरी | आमुचे घर भीमातिरी ||
पांडुरंग आमुचा पिता | रखुमाई आमुची माता ||
भाऊ पुंडलिक मुनि | चंद्रभागा आमुची बहिण ||
तुका जुनाट मिराशी | ठाव दिला पायांपाशी ||
भक्त पुंडलिकापासून वारीचा हा इतिहास चालू होतो. ज्ञानदेव पूर्वकाळ – भक्त पुंडलिकाचा काळ, ज्ञानदेव – नामदेव काळ, भानुदास – संत एकनाथ काळ, तुकाराम महाराज- निळोबा यांचा काळ आणि त्यानंतरचा ३ ते ४ शतकांचा हा कालखंड इतकी प्रदीर्घ अशी सातशे वर्षांची अखंड अशी वारीची परंपरा आपल्याला लाभलेली आहे.
आषाढी वारीच्या निमित्ताने सर्व संतांच्या पालख्या त्यांच्या गावातून पंढरपूरात एकादशीला दाखल होतात. ‘पंढरीचा वास, चंद्रभागेस्नान, आणि दर्शन विठोबाचे’ अशी वारकरी संप्रदायाची भावना आहे.
“विठू तुझ्या राउळात
संत झाले सारे गोळा
आली तुकयाची पालखी
चाले वैष्णवांचा मेला ||”
पालखी सोहळ्यासोबतच ‘रिंगण’ आणि ‘धावा’ ही वारीची वैशिष्ट्ये आहेत. मोकळ्या मैदानात वारकरी परस्परांचे हात धरून गोलाकार उभे राहतात, यातील मोकळ्या जागेतून ज्ञानेश्वर माउलींचा घोडा धावतो ‘माउलींचा अश्व’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अश्वावर ज्ञानेश्वर महाराज स्वतः आरूढ होता अशी धारणा आहे. कडूस फाटा, वेळापूर, आणि वखारी येथे रिंगण होते. तीन उभी आणि चार गोल रिंगणे होतात. त्यातील दोन रिंगणे ही जेवणापूर्वी तर दोन जेवानंतर होतात. दोन रस्त्याच्या उजव्या तर दोन रस्त्याच्या डाव्या बाजूने होतात. माउलींचा अश्व हा श्री श्रीमंत शितोळे सरकार यांच्या अंकली-बेळगाववरून श्री क्षेत्र आळंदीस परंपरेनुसार पायी आणला जातो. अश्वांच्या स्वागतासाठी मंदिरात पायघड्या घातल्या जातात. रिंगणानंतर होणारा ‘उडीचा कार्यक्रम’ हा अवर्णनीय असतो.
“आषाढीला चाले माझ्या
ज्ञानदेवाची पालखी
खेळे पाऊली रिंगण
नाम विठ्ठलाचे मुखी ||”
तर ‘धावा’ म्हणजे धावणे. असे म्हणतात की पंढरपूरला जाताना तुकाराम महाराजांना वेळापूर येथील छोट्या टेकडीवरून विठ्ठलाच्या देवळाच्या कळसाचे दर्शन झाले आणि पांडुरंगाच्या ओढीने तिथून पंढरपूरापर्यंत ते धावत गेले. या आख्यायिकेचे स्मरण म्हणून वारकरी देखील हा शेवटचा टप्पा धावत पार करतात.
‘जन्माजन्मीची संगत | भेटी झाली अकस्मात ||
आतां सोडितां सुटेना | तंतु प्रीतीचे तुटेना ||
माझे चित्त तुझ्या पायां | मिठी पडली पंढरीराया ||
तुका म्हणे अंती | तुझी माझी एक गत ||
लाखोंच्या संख्येने लोक सामील होतात परंतु वारीत भांडण-तंटे किंवा वारीमुळे इतर जीवनमानात कधी अडचण झाल्याचे ऐकिवात नाही. काही असेलच तर वाद रात्री तळावर सोडविण्यात येतात. वारी सोहळ्यात मानाच्या कीर्तनाव्यतिरिक्त इतर कुठलेही कीर्तन होत नाही. ह्या कीर्तन सेवा श्री हैबतबाबा यांच्या पासून चालत आल्या आहेत व त्यांचे पूर्वज आजही अत्यंत श्रद्धेने त्या पार पाडत आहेत. वारीत चालत असताना म्हणावयाच्या अभंगांचा क्रम आणि नियम ठरलेला असतो. ठराविक वेळांचे अभंग त्या त्या दिवशी म्हटले जातात. प्रत्येक दिंडीत मात्र एकावेळी एकच अभंग ऐकू येतो. विसाव्याच्या जागी जोवर माउली विसावत नाही तोवर दिंडी देखील विसावा घेत नाही. काही वारकरी संपूर्ण वारीभर पाणी वाटपाचे कार्य करतात, काही अनवाणी चालतात. निष्काम सेवेचा धडा या वारीतून मिळतो.
वारीमध्ये अखंडपणे ‘ज्ञानोबा-तुकाराम’ हा गजर चालू असतो. एक शब्द श्वास आहे तर दुसरा म्हणजे उच्छ्वास. या दोन नावांत माउलींच्या पूर्वीचे, दोघांच्या दरम्यानचे व तुकोबारायांच्या नंतरचे सर्व संत सामावले आहे अशी मान्यता आहे.
अत्यंत पराकोटीच्या प्रेमाचा, भक्तीचा, श्रद्धेचा हा सोहळा म्हणजे अखंड महराष्ट्राच्या जिव्हाळ्याचा विषय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जरी ह्या आनंदाला आपण मुकलो असलो तरी श्री पांडुरंगाचे प्रेम आणि भक्तांची ओढ यामुळे आपण लवकरच सावरू.
वारी म्हणजे फक्त भक्ती नाही तर तो एक ‘निष्काम कर्म योग’ आहे. अखंड सेवा आणि त्यागाची वृत्ती आहे. समर्पणाची सीमा आहे. प्रेमाची व्याख्या आहे. शिस्तीचा परिपाठ आहे. जरी आपण वारीला जात नसलो, त्याचा भाग कधी झालो नसेल तरी वारीचे हे विशेष आणि गुण आयुष्याचा भाग बनवणे ही देखील ईश्वर सेवाच घडेल. आयुष्याला दिशा देण्याचे, समाधानाचा मार्ग दाखवण्याचे कार्य ह्या भावांतून नक्कीच साध्य होत असावे. वारीबद्दल जाणून घेतल्यावर त्याचा भाग होण्याची इच्छा न होणारा मनुष्य विरळाच भेटेल. हा नामदेवांच्या गाथेतील अभंग म्हणजे संपूर्ण आषाढी वारीच्या, साक्षात पांडुरंग आणि त्याच्या प्रिय भक्तांच्या भावनांचे यथोचित शब्दांकन आहे.
आषाढी कार्तिकी विसरू नका मज | सांगतसे पांडुरंग ||१||
पतितपावन मी तो आहे खरा | तुमचेनि बरं दिसतसे ||२||
तुम्ही जाताना गावाहून हुरहुर माझे जीव | भेटाल कधी मजलागीं ||३||
धावून देव गळां घाली मिठी | स्फुंदून स्फुंदून गोष्टी बोलतसे ||४||
तिन्ही त्रिभुवनी मज नाही कोणी | म्हणे चक्रपाणि नामयाशी ||५||