सांगितलें काम करावें कवित्व । वाउगें निमित्त बोलों नये ।।
प्रमाणाची संख्या सांगे शत कोटी । उरले ते शेवटीं लावी तुका||
तुकाराम महाराजांसारख्या संतश्रेष्ठांनी व्यक्त केल्याप्रमाणे शतकोटी अभंग लेखनाची कल्पना सुचणारे संत नामदेव म्हणजे मराठीचे अनमोल रत्न.
भारताच्या साहित्य आणि समाजजीवनामध्ये नवचैतन्य, आधुनिकता, सात्विकता आणि परखडपणे समाजजीवनावर भाष्य करण्याचे काम संतांनी वेगवेगळ्या कालखंडात केले. महाराष्ट्राच्या संत परंपरे मध्ये संत ज्ञानदेव, त्यांना समकालीन नामदेव, एकनाथ, तुकाराम व संत रामदास यांचे कार्य साहित्य आणि समाजजीवन दोघांमध्ये अद्वितीय आहे. त्यांनी लिहिलेले साहित्य शतकांनंतरही महाराष्ट्राला दिशा देण्याचे कार्य करत आहेत. त्यांना पंचप्राण म्हणणे काही वावगे ठरणार नाही. प्राचीनकाळी वाल्मिकींनी शतकोटी रामायण रचले असे मानले जाते. त्याच धर्तीवर याही कल्पनेचा उदय झाला असावा असे मानले जाते. पण आजच्या कलियुगात हे तितकेसे एका माणसाकडून शक्य नाही त्यामुळे ह्या कामात त्यांना त्यांच्या कुटुंबीयांनीदेखील हातभार लावला आणि सर्व मिळून ९६ कोटींची रचना पूर्ण केले असे म्हणतात. परंतु सध्या आपल्याकडे उपलब्ध असलेले साहित्य हे त्या मानाने फारच कमी आहे.
त्यांचा जन्म शके ११९२ मध्ये झाला असावा यावर एकमत आढळून येते. त्यांच्या जन्मस्थानाबद्दल अनेक मत आणि वेगवेगळे उल्लेख आढळतात. काही जण पंढरपूर तर काही नरसी-बामणी येथे त्यांचा जन्म झाला मानतात परंतु ह्या स्थानाबद्दल पण एकमत नाही कारण याच नावाची दोन-तीन ठिकाणं आढळतात. परंतु जनाबाई व संत एकनाथ यांच्या अभंगात पंढरपूरचाच उल्लेख येतो. त्यामुळे नामदेवांच्या जन्मापूर्वीच पंढरपुरात स्थायिक झाले असावे असा कयास करतात.
मूळ परभणीच्या येथे नरसी-बामणी या जोडनावाने प्रसिद्ध गावं आहेत. तेथेच जवळचं कयाधु/कयाड नदीच्या काठी त्यांची एक समाधी आहे. तर त्यांच्या घराची जागाही दाखवितात. तर ज्या गावी जाऊन विसोबा खेचरांकडून नामदेवांनी गुरुउपदेश घेतला ते नागनाथाचे आवंढे गाव हे नरसीपासून जवळच आहे त्यामुळे त्यांच्या मूळघराण्या बाबत हेच ते नरसी असावे असे म्हणता येईल.
नामदेव महाराजांचे वैशिष्टय किंवा वेगळेपण हे होते त्यांनी महाराष्ट्राच्या सीमांपलीकडे जाऊन ‘नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी’ म्हणत भागवत धर्माची पताका फडकावली. गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, पंजाब व बिहार इत्यादी प्रांतात त्यांचा प्रभाव आढळून येतो. शिखांच्या आदिग्रंथात ‘ग्रंथ साहिबा’ मध्ये नामदेवांच्या नावावरील ६१ पदे समाविष्ट करण्यात अली आहेत. हिंदी भाषेतील त्यांच्या काही रचनाही उपलब्ध आहे. ‘संत नामदेव कि गुरुबानी’ या नावाने ती शीख धर्मियांच्या नित्य पठणाचा भाग आहेत. नामदेव हे ज्ञानेश्वरांना पूज्य मानीत. ते ज्ञानदेवांकडे शके १२१४ च्या सुमारास आले त्यावेळी त्यांचे साधारण वय २०-२२ च्या दरम्यान असावे. मुक्ताईंनी त्यांच्या भक्तीचा अहंकारावर भाष्य केले होते. पुढे आपली अंध व सगुण भक्ती टाकून ते भागवत संप्रदायाकडे ज्ञानदेवांच्या प्रेरणेने वळले. ज्ञानदेवांच्या आज्ञेवरून विसोबा खेचरांना गुरु मानून अनुग्रह घेतला
अनेक आख्यायिकां प्रमाणेच संत नामदेवांचा जन्म एका शिंपल्यात झाला अशी दंतकथा संत चरित्रकार महिपतींनी ‘भक्तविजय’ मध्ये सांगितले आहे. परंतु स्वतः नामदेवांनी आपल्या एका अभंगात ‘प्रसवली माता मज मळमुत्री’ असे स्पष्ट म्हटले असल्याने त्यावर जास्त काही चर्चा करण्याचे कारण नाही.
देहभान विसरून, एक हाती विना घेऊन हरिनामाचा घोष करत देवाशी संवादासाठी त्यांनी अभंग संकीर्तनाचा मार्ग निवडला. त्यांच्या ज्ञानाने डोळस भक्तीला प्रेमाचा ओलावा त्यांनी दिला. त्यांच्या अभिव्यक्तीचे साधन म्हणून त्यांनी काव्यनिर्मिती केली. उत्कट भावनांचे ते दर्शन असलेल्या कवितांची भाषा अत्यंत रसाळ पण साधी सोपी होती.
‘तूंचि माझे व्रत तूंचि माझे तीर्थ । तूंचि धर्म अर्थ काम देवा ।।’
पंढरपूरच्या विठोबाशी इतकी उत्कट भाव बाळगणाऱ्या नामदेवांनी आपले अखेरचे दिवस पंढरपुरात घालविले आणि ८० व्या वर्षी तिथेच आपला देह ठेवला. पंढरपूरच्या श्री पांडुरंगाच्या मंदिराच्या प्रवेश द्वारातील ‘नामदेवांची पायरी’ हि त्यांची समाधी म्हणून ओळखली जाते.