‘भविष्य’ गूढ, अनाकलनीय आणि तितकेच आकर्षित करणारा विषय आहे. भविष्याचा वेध घेणं ही माणसाची कायमची इच्छा राहिली आहे, त्यामुळे त्याविषयी एकापेक्षा एक सुरस कथा, दंतकथा जगाच्या कानाकोपऱ्यात आपल्याला ऐकायला मिळतात. अनेक जण प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचतात, पण नॉस्ट्रॅडेमस सारखी प्रसिद्धी, गूढतेचं वलय आणि आकर्षण शतकांनंतरही राहिले हे क्वचितच आहे. मिशेल नॉस्ट्रॅडेमस या फ्रेंच भविष्यवेत्त्याचा जन्म २३ डिसेंबर १५०३ रोजी झाला. धर्माने ख्रिश्चन असला तरी त्याला ज्यू धर्माचा वारसा लाभला होता.
धर्माबद्दल अत्यंत सनातनी वातावरण असणाऱ्या काळात त्याचा जन्म झाला. धर्माविरुद्ध बोलणं, मत मांडणं यांना मृत्युदंड ही एकच शिक्षा असायची. वैज्ञानिक, विचारवंत, तत्त्ववेत्ते अशा लोकांसाठी अत्यंत कठीण मानल्या गेलेल्या काळात, फ्रांस मध्ये हा एक अत्यंत हुशार स्वतःची वेगळी विचारधारा असणारा मुलगा जन्माला आला. ज्यू वारसा लाभलेल्या नॉस्ट्रॅडेमसला वैद्यकशास्त्र, खगोलशास्त्र, इतिहास, पंचांग, ग्रह, नक्षत्र, कालगणना, गणित यांविषयीचे धडे बालपणीच मिळाले. वैद्यकशास्त्राच्या अभ्यासक्रमाला त्याने प्रवेश घेतला होता. १५२२ मध्ये आपले गाव सोडून मोपलीये गावी त्याला घरच्यांनी पाठवून दिले. पदवीसोबतच डॉक्टरेट देखील त्याने मिळवली. ‘पृथ्वी सूर्याभोवती फिरते’ अशा विज्ञाननिष्ठ विचारांचा तो पुरस्कार करत असे, त्याच्या ह्या वागण्यामुळे त्रास होऊ नये म्हणून त्याला वैद्यकशास्त्राच्या अभ्यासासाठी दूर पाठविण्यात आले होते. त्याच्या शत्रूंनी त्याला धर्मसत्तेपुढे दोषी ठरविण्यासाठी कट आखला आणि त्याची कुणकुण लागताच रातोरात त्याने घर सोडले.
पुढचे सहा वर्ष स्वतःचा जीव वाचविण्यासाठी तो युरोपभर भटकत राहिला. त्याच काळात ज्योतिष, गूढ विद्या, दुर्मिळ औषधी यांचा अभ्यास त्याने केला. त्यातच तो दैवी भविष्यवेत्ता म्हणून प्रसिद्धीस आला. प्लेगची साथ चालू असताना त्याने त्याचा वैद्यकीय पेशा निवडला. प्लेगचा नायनाट करणे हे ध्येय असलेल्या त्याने ज्योतिषविषयाला पूर्णवेळ देण्याचे टाळले. प्लेग हा अस्वच्छतेमुळे पसरतो हे त्याला माहित होते पण ‘रोग हे तुमच्या पापाचे फळ आहे’ असं म्हणत त्यावरील औषधोपचारास चर्चची मान्यता नव्हती. त्यामुळे त्याने एक दैवी औषध बनविण्याचे नाटक करून ते औषध घेताना प्रचंड स्वच्छता पाळण्याचे सांगितले. प्लेगची साथ गेल्यावर मात्र तो पूर्णपणे भविष्य या विषयाकडे वळला. इतर विषयांसोबतच त्याचे भाषेवर देखील असामान्य प्रभुत्व होते. होरस अपोलो, ट्रेटे डेस फार्लेमेंट्स प्रॉफेसिज हे ग्रंथ त्याच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध झाले पण तो खरा अमर झाला तो त्याच्या ‘सेंच्युरीज’ ह्या ग्रंथामुळे. कारण या ग्रंथातच त्याने पुढील शतकांचे भविष्य वर्तविले होते. चर्चकडून आरोप होऊ नये म्हणून त्याने भविष्यातले श्लोक गूढ आणि सांकेतिक भाषेत लिहिले होते. आजही त्याच्या बाबतचे अभ्यासक त्या श्लोकांचे अनेक वेगवेगळे अर्थ सांगतात. त्याने त्याच्या हिशोबाप्रमाणे जगाच्या आतापर्यंतचे म्हणजेच १६ व्या शतकापासून पुढील २२४२ वर्षांचे भविष्य वर्तवले.
त्याच्याबाबत अभ्यास करणाऱ्यांच्या मते त्याने सांगितलेली किंवा श्लोकांत वर्तवलेली भविष्ये मोठ्या प्रमाणात खरी ठरली आहेत. त्याच्या जीवनकाळातच फ्रांसच्या राजघराण्यासाठी राजा हेनरी द्वितीयची राणी हिच्या सांगण्यावरून भविष्य वर्तवले होते, ते खरे ठरले होते. तर चार्ल्स नववा (१५६४) याच्यासाठी देखील काम केले. दुसरे महायुद्ध, विमाने, पाणबुड्या, अणुबॉम्ब, क्षेपणास्त्र, तसेच हिटलर सारखे हुकूमशहा यांच्याबाबत त्याने वर्तवले आहे असे त्याबाबतचे अभ्यासक सांगतात. अगदी अलीकडचे म्हणजेच कोरोना महामारीचे देखील त्याने भाकित केले होते वगैरे सारख्या बातम्या येत आहेत. त्याने सांगितलेल्या काही घटना सुदैवाने घडल्या नाहीत, काहींच्या अर्थांबाबत मतमतांतरे आहेत पण जगात कोणतीही मोठी घटना घडली की नॉस्ट्रॅडेमस आणि त्याच्या श्लोकांचे अर्थ पुन्हा चर्चेत येतात. अशा ह्या वादग्रस्त, गूढ आणि तितक्याच आकर्षित करणाऱ्या भविष्यवेत्त्याचा वयाच्या ६३ व्या वर्षी २ जुलै १५६६ ला मृत्यू झाला.